'Apratim Mahavkta - The Public Talent Reality Show Series 2032
जागतिक ध्येय अर्थात शाश्वत विकास ध्येय समोर ठेवूनच विकासाची प्रक्रिया होणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यासाठी या ध्येयांचे स्थानिकीकरण अधिक महत्त्वाचे आहे. या प्रभावी स्थानिकीकरणासाठी विकास पत्रकारितेला बळ देण्यासंबंधी िविध उपक्रम राबविणार्या अप्रतिम मीडियाने ‘ए एम २०३२ लाईव्ह’ ‘अप्रतिम महावक्ता – पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज – 2032 शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने‘ हा उपक्रम आखलेला आहे. अप्रतिम महावक्ता ही फक्त वक्तृत्वाची स्पर्धा किंवा व्याख्यानमाला नाही, तर सर्व वयोगटातील नागरिकांसाठी इतर अनेक प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. गाव, तालुका, जिल्हा पातळीवर या स्पर्धांच्या व्यतिरिक्त शाश्वत विकास ध्येयांसंबंधी जनजागृती करणारे अनेक कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
ग्रामीण व शहरी वार्ताहरांच्या माध्यमातून राबविला जाणारा हा कृती आराखडा आहे. वस्ती, खेडे-गाव असो की लहान मोठे शहर, उपराजधानी की राजधानी असो सर्वत्र स्थानिक समस्या आणि सर्वसमावेशक विकास समस्या यांचा शासकीय अशासकीय पातळीवर धांडोळा घेतला जातो. नियोजन खात्याची सांख्यिकी एवढा एक आधार समोर ठेवून अहवाल प्रकाशित होत असतात परंतु प्रत्यक्ष लोकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी विशेष कृती कार्यक्रम दिसत नाहीत.
अप्रतिम महावक्ता ही अशी एक संकल्पना आहे की, सर्व घटकांना एकत्र करून विकास प्रक्रियेचा लेखाजोखा अभिनव पद्धतीने मांडायचा जो सर्वसामान्य माणसाला सहजी समजेल. स्वतः पत्रकार हा समन्वयक म्हणून त्या त्या ठिकाणी पुढाकार घेणार आहे. त्यामुळे वस्तुनिष्ठ आशय निर्मिती आणि स्थानिक स्वराज्य संस्था व लोकप्रतिनिधींवर दबाव, पारदर्शकता गुणवत्ता उत्पादकता या गोष्टींसाठी थेट कृती आराखडा म्हणून अप्रतिम महावक्ता ची संकल्पना तयार करण्यात आली आहे.
या संकल्पनेनुसार महाराष्ट्रात ६ महसूल विभाग ३६ जिल्हे ३५८ तालुके आणि चाळीस हजारांपेक्षा अधिक खेडी या सर्व ठिकाणी प्रारंभीच्या काळात शाश्वत विकास ध्येयांच्या जनजागृती चे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. या उपक्रमाची सुरुवात ६ जानेवारी २०२३ रोजी मराठी पत्रकार दिनाच्या दिवशी मुंबई येथे करण्यात आली आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते अप्रतिम महावक्ताच्या लोगोचे अनावरण करण्यात आलेले आहे. त्यानंतर ३० नोव्हेंबर २०२३ रोजी मुंबई येथे पहिली महाराष्ट्र शाश्वत विकास ध्येय परिषद घेण्यात आली आहे.



