आमच्याविषयी / About Us​​

अप्रतिम मीडिया प्रसारमाध्यम क्षेत्रातील बहुआयामी खाजगी संस्था आहे. विविध माध्यम संस्थांच्या सहकार्याने अनेक प्रकारचे उपक्रम राबवित असते. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात (२०१०–२०११) या संस्थेने नागरिकांसाठी ‘अप्रतिम महावक्ता’ या खुल्या वक्तृत्त्व स्पर्धेचे आयोजन केले होते. ही केवळ एक स्पर्धा न राहता, खऱ्या अर्थाने विकास मंथन करणारा उपक्रम झाला. पत्रकार डॉ. अनिल फळे यांनी त्या दृष्टीकोनातून संकल्पना तयार केली. ती भारत सरकारकडे कॉपीराईट कायद्यान्वये अधिकृतपणे नोंदविलीसुद्धा. ‘ए एम २०३२ ड्राईव्ह’ या सोशल ऑडीटकेंद्रित कृती आराखड्याचे मूळ रूप म्हणजे, ‘महाराष्ट्राचा अप्रतिम महावक्ता’ ही संकल्पना आहे. तेव्हा, २०१०-२०११ या काळात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या प्रमुख विभागामध्ये बहुतांश जिल्ह्यातील लोकांच्या विकास विषयक प्रतिक्रियांचे व्यापक संकलन केले होते. MDG (Millennium Development Goals) लक्षात घेऊन स्पर्धक नागरिकांसाठी स्थानिक समस्या ते समतोल विकास, बदलते हवामान ते एकूण पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य, गुणवत्तापूर्ण शिक्षण, बेरोजगारी समस्या, महिला सबलीकरण, प्रदूषित राजकारण यासह ३० विषय देण्यात आले होते. या उपक्रमाची माहिती ऐकून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी विशेष कौतुक केले होते. देशमुख मंत्रिमंडळातील सांस्कृतिक मंत्री अनिल देशमुख हे नागपूर येथील कार्यक्रमात सहभागी झाले होते.

याच काळात अप्रतिम मीडियाने राजकारण ते पर्यावरण अशा विविध क्षेत्रांमध्ये विशेष वृत्तांकन व विश्लेषण करणाऱ्या वार्ताहर ते संपादक पातळीवरील पत्रकारांसाठी “चौथास्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार” ही परंपरा सुरू केली. पहिला पुरस्कार वितरण सोहळा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर आजतागायत अनेक मान्यवर अप्रतिम मीडियाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहिले आहेत.

६ जानेवारी २०२३ रोजी दर्पण मराठी पत्रकार दिनी तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते “AM 2032 Drive” चे लोगो अनावरण करण्यात आले. आणि पत्रकारांना ‘चौथास्तंभ’ पुरस्कारांचे वितरणही झाले. गरजूंना योजना माहित झाली, तर त्या योजनेचा लाभ कसा घेतला पाहिजेत; यासाठी सरकारने नियमित कार्यक्रम राबविला पाहिजेत; याविषयी मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरच चर्चा झाली. त्याचबरोबर एसडीजी अंमलबजावणीविषयीही बोलणे झाले. मुख्यमंत्र्यांनी अप्रतिम मीडियाच्या एकूणच कार्यक्रमाचे कौतुक केले. पुढच्या काळात, महाराष्ट्रात ‘शासन आपल्या दारी’ सरकारी पद्धतीने अभियान राबविले गेले; असो.
त्या दरम्यान विरोधी पक्ष नेते होते, अजितदादा पवार. त्यांना ६ जानेवारीच्या कार्यक्रमाला काही कारणाने उपस्थित राहता आले नव्हते. त्यांची भेट घेवून माहिती दिली होती. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळात नियोजन व सांख्यिकी विभागात एसडीजी विशेष कक्ष स्थापन झाला होता. जिल्हा नियोजन मंडळांनी शाश्वत विकास ध्येयांच्या कामासाठी काही रकमेची तरतूद करावी, असा निर्णय त्या आघाडी सरकारमध्ये अर्थातच – अर्थ मंत्री असताना अजितदादा पवार यांनी घेतला होता. तेव्हा अजितदादांनी अप्रतिम मिडीयाच्या उपक्रमाची प्रशंसा केली होती.

३० नोव्हेंबर २०२३ रोजी मुंबई येथे पहिली राज्यस्तरीय SDG परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला केंद्रीय अर्थ व नियोजन राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. या परिषदेच्या संयोजनासाठी ‘मित्र’ या निती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या संस्थेचे उपाध्यक्ष / राज्य नियोजन मंडळाचे सदस्य राजेश क्षीरसागर यांनी सहकार्य केले होते. निमंत्रक म्हणून राजेश क्षीरसागर होते. तसेच विद्यमान अर्थ, नियोजन व सांख्यिकी खात्याचे राज्यमंत्री आशिष जायस्वाल यांनीही विशेष शुभेच्छा दिल्या होत्या. जायस्वाल यांना एसडीजी विषयक उत्तम जाण आहे, हे लक्षात घेवून मा. देवेंद्र फडणवीस यांनी संबंधीत विधीमंडळ समितीची जबाबदारी जायस्वाल यांच्यावर सोपविलेली होती. ही परिषद एक दिवसीय होती. नियोजन विभागाचे संचालक चौधरी, विजय आहेर यांच्यासह मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.रवींद्र कुलकर्णी, तंत्र शिक्षण माजी संचालक अजित थेटे, ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर, बालाजी सूर्यवंशी, मधुकर कांबळे, वसंत मुंढे, नगर विकास खात्यातील अधिकारी विकास नवाळे, यांच्यासह अनेकांनी परिसंवादप्रसंगी आपले विचार मांडले. परिषदेमध्ये ‘शासकीय योजना, लोकसहभाग आणि एसडीजी ध्येयसिद्धी’, ‘एसडीजी सिद्धीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था, नागरिक संघटनांची भूमिका’, ‘शाश्वत विकास ध्येयांसाठी विकास पत्रकारितेचे महत्त्व – स्थानिक वार्ताहर व विशेष अभ्यासक पत्रकारांचे योगदान’ हे ३ प्रमुख परिसंवाद घेण्यात आले. त्याचा लाभ विविध सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघटना, आरोग्यविषयक संस्था, उद्योग-व्यापारी-संस्था, पत्रकार, शासकीय-निमशासकीय अधिकार्यांनी घेतला. या परिषदेत संबंधीत क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या २८ व्यक्ती/संस्थांना ‘अप्रतिम एसडीजी गौरव’ हा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

जानेवारी २०१६ पासून SDG (Sustainable Development Goals) विषयक कामाला सुरुवात झाली आणि विविध उपक्रम राबविण्यात आले. या पार्श्वभूमीवर   अप्रतिम मेडिया आयोजित एसडीजी परिषदेत  महाराष्ट्र शासनाच्या नियोजन व सांख्यिकी विभागानेही परिषदेत SDG संदर्भात सादरीकरण केले होते, हे विशेष. आणि या विभागाने अप्रतिम मीडियाने राज्यभर अशाप्रकारचे कार्यक्रम करावेत, असे आवाहनही एका पत्रान्वये केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली “विकसित महाराष्ट्र 2047” हा आराखडा तयार करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शाश्वत विकास ध्येयांचे स्थानिकीकरण (Localization of SDGs) अत्यंत महत्त्वाचे ठरते.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री व शाश्वत विकासाचे पुरस्कर्ते नितीन गडकरी यांनी या उपक्रमास विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच नीती आयोगाचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांना “AM 2032 Drive” या दीर्घकालीन उपक्रमाची माहिती देण्यात आलेली आहे.

संचालकांची माहिती / To Get Our Directors Information

Celebrating 21 Years | Apratim Media Documentary