'अप्रतिम महावक्ता'- दि पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज २०१०-११​

महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 2010-11 साली सर्वप्रथम अप्रतिम मीडियाच्या वतीने महाराष्ट्रात अप्रतिम महावक्ता या नावाने सर्व नागरिकांसाठी खुले व्यासपीठ उपलब्ध करून दिले. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स डोळ्यासमोर ठेवून 30 विषय लोकांना देण्यात आले होते. या मूळ संकल्पनेची सुधारित आवृत्ती म्हणजे ए एम 2032 ड्राईव्ह आहे.

ग्रामीण व शहरी वार्ताहरांच्या माध्यमातून राबविला जाणारा हा कृती आराखडा  आहे. वस्ती, खेडे-गाव असो की लहान मोठे शहर, उपराजधानी की राजधानी असो सर्वत्र स्थानिक समस्या आणि सर्वसमावेशक विकास समस्या यांचा शासकीय अशासकीय पातळीवर धांडोळा घेतला जातो. नियोजन खात्याची सांख्यिकी एवढा एक आधार समोर ठेवून अहवाल प्रकाशित होत असतात परंतु प्रत्यक्ष लोकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी विशेष कृती कार्यक्रम दिसत नाहीत.

अप्रतिम महावक्ता ही अशी एक संकल्पना आहे की, सर्व घटकांना एकत्र करून विकास प्रक्रियेचा लेखाजोखा अभिनव पद्धतीने मांडायचा जो सर्वसामान्य माणसाला सहजी समजेल. स्वतः पत्रकार हा समन्वयक म्हणून त्या त्या ठिकाणी पुढाकार घेणार आहे. त्यामुळे वस्तुनिष्ठ आशय निर्मिती आणि स्थानिक स्वराज्य संस्था व लोकप्रतिनिधींवर दबाव, पारदर्शकता गुणवत्ता उत्पादकता या गोष्टींसाठी थेट कृती आराखडा म्हणून अप्रतिम महावक्ता ची संकल्पना तयार करण्यात आली आहे.

या संकल्पनेनुसार महाराष्ट्रात ६ महसूल विभाग ३६ जिल्हे ३५८ तालुके आणि चाळीस हजारांपेक्षा अधिक खेडी या सर्व ठिकाणी प्रारंभीच्या काळात शाश्वत विकास ध्येयांच्या जनजागृती चे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. या उपक्रमाची सुरुवात ६ जानेवारी २०२३ रोजी मराठी पत्रकार दिनाच्या दिवशी मुंबई येथे करण्यात आली आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते अप्रतिम महावक्ताच्या लोगोचे अनावरण करण्यात आलेले आहे. त्यानंतर ३० नोव्हेंबर २०२३ रोजी मुंबई येथे पहिली महाराष्ट्र शाश्वत विकास ध्येय परिषद घेण्यात आली आहे.